शिंदखेडा तालुक्यातील परसुळे येथील ग्रामपंचायत हद्दीतील दोंडाईचा-साक्री मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावरून अवजड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, शेतकरी, दुचाकीस्वार आणि गावकरी यांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ह्या रस्त्यावरून दोंडाईचा रेल्वे डेपो येथून साक्री, पिंपळनेर, दहिवेल अशा शहरांकडे जाणारी रासायनिक खतांची तसेच सिमेंटची अवजड वाहने नियमितपणे ये-जा करतात. जरी हा रस्ता ग्रामपंचायत हद्दीत येत असला, तरी या रस्त्याचा वापर आसपासच्या अनेक भागांतील नागरिक करत असल्याने त्याचे महत्त्व प्रादेशिक आहे. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताची शक्यता निर्माण होते. शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक आणि विशेषतः शेतीसाठी जाणारे शेतकरी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायतीकडून दरवर्षी खड्डे बुजवले जातात, मात्र काही महिन्यांतच पुन्हा त्यांची अवस्था जैसे थे होते.
या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील एका नागरिकाने ‘मेरी पंचायत’ या अॅपवर ऑनलाईन तक्रारही दाखल केली आहे. गावकरी व स्थानिक नागरिकांचा शासनाकडे ठाम आग्रह आहे की, ग्रामपंचायतीला योग्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून टिकाऊ पद्धतीने रस्त्याचे मजबुतीकरण करता येईल.
