मोटारसायकल चोर गजाआड; ५ चोरट्या दुचाकींसह १.५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती

दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एक चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून एकूण ५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक २७ जून २०२५ रोजी रात्री ९ ते २८ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी अविनाश सुनिल धनगर (वय २२, व्यवसाय – खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी, रा. राणीपुरा होळी चौक, दोंडाईचा) यांची बजाज कंपनीची लाल रंगाची पल्सर मोटारसायकल (MH18 CC 3436) त्यांच्या घरासमोरून चोरीस गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या आधारे दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला गती दिली. दिनांक ११ जुलै रोजी पेट्रोलिंग दरम्यान मांडळ चौफुली परिसरात एक इसम विना नंबरची लाल पल्सर मोटारसायकल घेऊन फिरताना संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याचे नाव जुनेद इसाक शेख (वय २०, रा. म्हाळसा नगर, दोंडाईचा) असे असल्याचे निष्पन्न झाले.

प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता, सदर मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सखोल चौकशीत आरोपीने आणखी चार दुचाकी चोरी करून सृष्टी गार्डनजवळ एका बंद घराच्या मागील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली.

जप्त केलेल्या दुचाकींचा तपशील पुढीलप्रमाणे:

  1. बजाज पल्सर – ₹50,000
  2. हिरो एचएफ डिलक्स (चेसिस नं. MBLHA11AED9M02450) – ₹25,000
  3. हिरो एचएफ डिलक्स (चेसिस नं. MBLHAR05XH9B30075) – ₹25,000
  4. हिरो एचएफ डिलक्स (चेसिस नं. MBLHAR054H936986) – ₹25,000
  5. बजाज डिस्कव्हर (चेसिस नं. MDRDSPAZZTWG40782) – ₹25,000

एकूण मुद्देमाल – ₹1,50,000

ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस निरीक्षक श्री. श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या कारवाईत डीबी पथकाचे पोसई नकुल कुमावत, पोहेकॉ रविंद्र गिरासे, पोकों हिरालाल सुर्यवंशी, प्रविण निकुंबे, सौरभ बागुलहोमगार्ड अमीन शहा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रविंद्र गिरासे करीत आहेत. पोलीस दलाच्या या जलद आणि नेमक्या कारवाईमुळे दोंडाईचा शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश बसण्यास मदत होणार आहे.

प्रतिनिधी समाधान ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top