धुळे तालुक्यातील महिलांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत!
धुळे | राज्य सरकारने दारू विक्रीसाठी नवीन परवाने देण्याचा निर्णय घेतल्यावर निमगुळ (ता. धुळे) येथील महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गावातील बचत गटातील महिलांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टकार्डद्वारे भावनिक आवाहन करत सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
“आमच्या कर्त्या पुरुषांना व्यसनाधीन करू नका,” अशी कळकळीची विनंती करत या महिलांनी दारू परवाने धोरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.
सरकारच्या धोरणाला महिलांचा विरोध
राज्य शासनाने घेतलेल्या नवीन दारू परवाने वाटपाच्या निर्णयावर ग्रामीण भागात रोष व्यक्त होत आहे. निमगुळच्या महिलांनी आपल्या पत्रात नमूद केले की,
“शेतीची परिस्थिती बिकट आहे, उत्पन्न नाही, खर्च भरमसाठ आहे. अशा वेळी व्यसनमुक्तीचे धोरण राबवण्याऐवजी सरकार व्यसन वाढवण्याचे पाप करत आहे.“
व्यसनामुळे महिलांचे जीवन उद्ध्वस्त
महिलांनी आपल्या अनुभवातून लिहिले की, दारूमुळे घरात भांडणे, तणाव, आर्थिक अडचणी, आत्महत्येचे विचार हे सर्व वाढले आहेत.
“व्यसनामुळे अनेक कुटुंबांची वाताहत होते. त्याचे परिणाम सर्वात जास्त महिलांनाच भोगावे लागतात,” असेही त्यांनी आपल्या पोस्टकार्डात नमूद केले.
पोस्टकार्ड आंदोलनाचे व्यापक पडसाद?
हे आंदोलन निमगुळपुरते मर्यादित राहील की त्यातून राज्यव्यापी विरोध उभा राहील, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण महिलांचा हा आवाज सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे, अशी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचीही भावना आहे.

