साक्री | नगराध्यक्ष पदासाठी उषा पवार यांचा अर्ज दाखल

भाजप व शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत नामनिर्देशन प्रक्रियेची पूर्तता

साक्री : साक्री नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी आज सौ. उषा अनिल पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला.

या वेळी भाजप व शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बापू पुंडलिक गीते यांची, तर दोन वेगवेगळ्या अर्जांवर मनीषा देसले आणि रेखा सोनवणे यांची अनुज्ञापक म्हणून स्वाक्षरी होती.

नगरपंचायतीतील सत्तांतराचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिनांक ३० जून रोजी जयश्री पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्त केले.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या अनुषंगाने आजच्या तारखेला (२१ जुलै) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, विजय भोसले, आबासाहेब सोनवणे, पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ, तसेच नगरसेविका मनीषा देसले, जयश्री पगारिया, अँड. गजेंद्र भोसले, प्रवीण निकुंभे, संगीता भावसार यांची उपस्थिती होती. शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे, सुमित नागरे, राहुल भोसले, सोनल नागरे तसेच काँग्रेसचे प्रतिनिधी जुबेर पठाण हेही यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे कामकाज मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, बांधकाम अभियंता तेजस लाडे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या देखरेखीखाली पार पडले.

सत्तांतराच्या या हालचालीमुळे साक्रीतील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, येत्या काही दिवसांत अधिकृत निवड होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता त्याकडे लागले आहे.

प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top