मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भव्य आरोग्य शिबिर; ३८१५ नागरिकांची तपासणी, २७० बाटल्या रक्तदान

धुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील मिल परिसरात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आणि ए.बी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबिरात एकूण ३८१५ नागरिकांची मोफत तपासणी व निदान करण्यात आले, तर रक्तदान शिबिरात २७० बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, नेत्ररोग, दंतरोग, पचनतंत्र विकार तसेच महिलांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीसह मोफत सल्ला आणि आवश्यक रुग्णांना औषध वाटपही केले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महिला प्रदेश उपाध्यक्षा कल्याणी अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, महादेव परदेशी, विश्व हिंदू परिषदेचे उमेश चौधरी, नागसेन बोरसे, बंटी मासुळे, प्रवीण अग्रवाल यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान शिबिरालाही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना जीवनदान देण्यास हातभार लावला.

आपलं आरोग्य, आपली जबाबदारी‘ या संकल्पनेला साजेशी अशी ही उपक्रमशृंखला ठरली असून, या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top