तरुणांसाठी नोकरीचे नवे दालन खुले – पालकमंत्री जयकुमार रावल
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिक, कृषी, आरोग्य, पर्यटन, शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांनी या नव्या संधींचा लाभ घेत स्वतःच्या करिअरसाठी नव्या दिशा निवडाव्यात,” असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
दोंडाईचा येथील शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटीमध्ये आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ उद्घाटन पालकमंत्री रावल यांच्या हस्ते पार पडले.
२५ कंपन्यांचा सहभाग, १००० हून अधिक रोजगाराच्या संधी
या रोजगार मेळाव्यात २५ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून १००० पेक्षा अधिक नोकरीच्या संधी विविध शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, बीएस्सी (अॅग्री) अशा सर्व स्तरांतील युवकांसाठी संधीचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
रोजगार निर्मितीसाठी विविध क्षेत्रांत गुंतवणूक
पालकमंत्री रावल यांनी यावेळी बोलताना सांगितले की,
“मेक इन इंडिया” आणि “मेक इन महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, कृषीप्रक्रिया, शीतगृह, स्मार्ट सिंचन, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो प्रकल्प आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे कुशल आणि अकुशल कामगारांसाठी भविष्यात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, गेम डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब, ब्लॉगिंग या क्षेत्रातही ग्रामीण भागातील तरुणांसाठी डिजिटल स्वरोजगाराचे नवीन दालन खुले झाले आहे.
गुंतवणुकीतून लाखो रोजगारांची शक्यता
२०२९ पर्यंत सौर ऊर्जा, EV चार्जिंग स्टेशन, ग्रीन बिल्डिंग्स आदी प्रकल्पांमुळे १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्याचा अंदाज असून, हेल्थटेक, टेलिमेडिसिन, आयुष, कौशल्य विकास केंद्रे, तसेच गड-किल्ले पर्यटन, इको-टुरिझम यामधूनही स्थानिक युवकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी सांगितले की,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर १०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, धुळे जिल्ह्यातील हा जिल्हास्तरीय मेळावा विशेष आहे. यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाही समाविष्ट करण्यात आली असून, याअंतर्गत ३२०० लाभार्थ्यांना आतापर्यंत प्रशिक्षणाचा लाभ मिळाला आहे.
उपस्थित मान्यवर आणि आयोजन
या मेळाव्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, प्राचार्य के.डी. गिरासे, तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डी.एम. गिरासे यांनी तर आभारप्रदर्शन व्ही.एम. गिरासे यांनी केले.

