धुळे महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी मालमत्ता करात 26 टक्क्यांवरून 36 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यामुळे नागरिकांना प्रचंड वाढीव बिले प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिका आवारात घंटानाद आंदोलन करून राज्य शासनाच्या उपकर टक्केवारीविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आमदाराच्या मागणीवरून आयुक्तांचा निर्णय:
शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मागणीनुसार महापालिका आयुक्तांनी मालमत्ता कराची टक्केवारी 36 वरून 30 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली असली, तरी नागरिकांना मिळालेली बिले अजूनही भरमसाठच आहेत. यामागे मालमत्ता मोजणी करणाऱ्या अमरावती येथील स्थापत्य सल्लागार संस्थेने चुकीची व वाढीव मोजणी केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे राज्याच्या विकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी पुन्हा नव्याने मालमत्ता मोजणी करून बिले तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाकडे जाणारे कर मोठ्या प्रमाणात:
या बिलांमध्ये मालमत्ता कराव्यतिरिक्त राज्य शासनाकडे थेट जमा होणारे शिक्षण कर (6% निवासी, 12% व्यावसायिक), रोजगार हमी कर (3%) व मोठ्या निवासी जागा कर (10%) असे तब्बल सोळा उपकर समाविष्ट आहेत. यामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहर, जास्त कर भार:
धुळे शहर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये समाविष्ट असून, जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न राज्यात शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरातील तब्बल 40% नागरिक दारिद्र्यरेषेखाली, 30% मध्यमवर्गीय आणि फक्त 20% उच्च वर्गीय आहेत. त्यामुळे इतका जास्त कर आकारणे अन्यायकारक असल्याचे मत आंदोलकांनी मांडले.
शिवसेनेची ठाम मागणी:
“महानगरपालिकांनी वेळोवेळी मालमत्ता कराचे रिव्हिजन केले नाही म्हणून एकाच वेळेस एवढा कर लावून सामान्य नागरिकांना पिळून काढू नये. राज्य शासनाकडे जाणाऱ्या उपकरांची टक्केवारी तातडीने कमी करावी,” अशी ठाम मागणी शिवसेना उबाठा पक्षाने केली आहे. नगरसचिवांची भेट घेऊन राज्य शासनस्तरावर हे आंदोलन पुढे नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
घंटानाद आंदोलनात शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भगवान करणकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, डॉ. अनिल पाटील, सुनील चौधरी, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, महादू गवळी, पंकज भारस्कर, विवेक सूर्यवंशी, कपिल लिंगायत, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, सागर निकम, अजय चौधरी, नितीन देशमुख, राजू दहातोंडे, पिंटू ठाकूर, गोकुळ बडगुजर, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, शुभम रणधीर, दिनेश गुरव, सागर साळवे, वैभव पाटील, हर्षल वाणी, विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, काशिनाथ गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

