चाळीसगाव येथे महामार्ग पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६० कोटी रुपये किंमतीचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ड्रग्जमध्ये अँफेटामाईन किंवा केटामाईनसारखा उच्चप्रभावी आणि प्रतिबंधित पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या कारवाईत वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असून ८ वर्षे तुरुंगवास भोगून आलेला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
नाकाबंदी दरम्यान सापडली संशयास्पद ब्रेझा
कन्नड घाटाखाली महामार्ग वाहतूक शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली होती. यावेळी DL 9C BB 7771 क्रमांकाची मारुती ब्रेझा गाडी पोलिसांच्या संशयाच्या रडारवर आली. गाडीत काय आहे, असा सवाल पोलिसांनी चालकाला केल्यावर, “कुछ मत पूछो साब, आपको क्या चाहिए बोलो,” असा संशयास्पद प्रतिसाद मिळाला.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपासणी करण्यात आली असता, गाडीत अमली पदार्थांची प्रचंड मात्रा आढळून आली.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून, पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत मोजमाप करून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
ड्रग्ज कुठून आले आणि कुणासाठी?
ही संपूर्ण खेप औरंगाबाद मार्गे बेंगळुरू नेली जाणार होती, असा खुलासा चौकशीदरम्यान समोर आला आहे. ड्रग्ज कुठून आले, कोणत्या गँगशी संबंधित आहेत, आणि अंतिम टप्पा कोणता होता – याचा तपास पोलीस अधिक खोलवर करत आहेत.

