कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला शिवसेना (उबाठा)चा तीव्र विरोध; काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने

महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या धुळे जिल्हा दौऱ्याला आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. मंत्री कोकाटे हे शिंदखेडा तालुक्यातील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी आले असताना, त्यांचा मुक्काम धुळे शहरातील टॉप लाईन हॉटेलमध्ये होता. त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

“मंदिरासारख्या पवित्र विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणाऱ्या मंत्र्याची हकालपट्टी करा,” “चले जाव, माणिक कोकाटे चले जाओ,” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी टॉप लाईन हॉटेलसमोर दोन तास आंदोलन केलं. कृषिमंत्री कोकाटे यांना या काळात हॉटेलबाहेर पडू दिलं गेलं नाही.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मंत्री कोकाटे यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. “शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट भेडसावत असताना, आणि कांदा-कापूस उत्पादक अडचणीत असताना, कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता खाजगी कार्यक्रमांना वेळ देत आहेत,” असा आरोप आंदोलकांनी केला.

शिवसैनिकांनी मंत्री कोकाटे यांच्या विधानसभेतील वर्तनावरही आक्षेप घेत, “असे मंत्री सरकारमध्ये राहण्यास अपात्र असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित त्यांच्या हकालपट्टीसाठी पावले उचलावीत,” अशी मागणी केली.

या निदर्शनात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. त्यामध्ये भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज भारस्कर, सागर निकम, पिंटू ठाकूर, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, वैभव पाटील, केतन भामरे, गुलाब देवरे, मनोज पाटील कुंडाणे, अमोल पाटील, विजय चौधरी, शांताराम माळी, ईश्वर मराठे, सावता माळी, महादेव आदींचा समावेश होता.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top