जलजीवन मिशनचं देयक रखडल्याने सांगलीतील होतकरू कंत्राटदाराची आत्महत्या; धुळे जिल्हा काँट्रॅक्ट्स असोसिएशनचा प्रशासनाला इशारा

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील होतकरू व उमदा कंत्राटदार कै. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत घेतलेल्या कामांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेत आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यानंतर या घटनेमुळे राज्यभरातील ठेकेदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

धुळे जिल्हा काँट्रॅक्ट्स असोसिएशनने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हर्षल पाटील यांच्या आत्महत्येला शासनाच्या दुर्लक्ष व रखडलेल्या देयकांना जबाबदार धरले. निवेदनात म्हटलं आहे की, पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कामासाठी सुरुवातीला स्वतःचे भांडवल लावले, नंतर पत्नी व आईचे दागिने मोडले. तरीही पुरेसा निधी न मिळाल्याने त्यांनी सावकारांकडून व ओळखीच्या लोकांकडून उधारीवर पैसे घेऊन काम पूर्ण केले.

मात्र, काम पूर्ण होऊनही जिल्हा परिषद सांगली कडे तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांची बिले दीर्घकाळ प्रलंबित होती. दुसरीकडे उधारीची परतफेड करण्यासाठी कर्जदारांचा तगादा वाढत होता. अशा चक्रव्युहात अडकून, शेवटी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, ५ वर्षांची मुलगी, वृद्ध आई-वडील व दोन लहान भाऊ असा संपूर्ण कुटुंब कै. पाटील यांच्यावरच अवलंबून होता.

असोसिएशनचे प्रतिनिधी सुधीर महाले, प्रदीप चौधरी, अरविंद राजपूत, राहुल पाटील, आशुतोष पाटील, शोभराज जाधव, दिलेन्द्र जमादार, कैलास जाधव आदींनी हस्ताक्षरित निवेदनात म्हटले आहे की —
“जर शासनाला खरंच वाटत असेल की हर्षल पाटील यांच्यासारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, तर जलजीवन मिशनसह सर्व शासकीय योजनेतील प्रलंबित देयके त्वरित मंजूर करावीत. अन्यथा राज्यातील सर्व ठेकेदारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होईल.”

या घटनेमुळे शासकीय पातळीवर खळबळ उडाली असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top