शिरपूर – मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेरजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॉल्याचा सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना महामार्गावरील स्पीड ब्रेकरजवळ घडली. ट्रॉला भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॉला थेट समोरून चाललेल्या सफरचंद भरलेल्या ट्रकवर आदळला. या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताचा संपूर्ण प्रकार महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत, दोन्ही जखमींना शिरपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अधिक तपास शिरपूर पोलीस करत आहेत.
