मालमत्तांचे अवास्तव मूल्यांकन करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा : शिवसेने (उबाठा ) चा आयुक्तांना घेराव

धुळे – धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टंट कंपनीने नागरिकांची फसवणूक करत मनमानी पद्धतीने व अवास्तव दराने मालमत्ता कर आकारणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात शिवसेना उबाठा गटाने आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना सडेतोड निवेदन देत तब्बल तासभर घेराव घातला.

महानगरपालिकेच्या महासभेच्या ठरावानंतर अमरावती येथील कंपनीला १६ कोटी रुपये देऊन मालमत्ता मूल्यांकनाचा ठेका देण्यात आला होता. मात्र या कंपनीने जीआयएस आधारित सर्वेक्षण, युनिक प्रॉपर्टी कोड नोंदणी, तांत्रिक सर्वेक्षण, संगणकित नकाशे आणि डिजिटल फोटोंच्या आधारे मूल्यांकन करणे या सर्व महत्त्वाच्या अटी पाळल्या नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराने धुळेकरांच्या मालमत्तांचे अतिशय जास्त व चुकीचे मूल्यांकन करत महापालिकेला आर्थिक फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी सामान्य नागरिकांवर अनावश्यक आर्थिक ओझे लादण्यात आले आहे. धुळे शहरातील ११ समाविष्ट गावांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रातील शेवटून दुसऱ्या क्रमांकावर असूनही धुळेकरांवर राज्यातील इतर ड वर्ग महानगरपालिकांच्या तुलनेत अवाजवी मालमत्ता कर लादण्यात आला आहे.

शिवसेनेने महापालिकेच्या निर्णयावर ताशेरे ओढत असा अनोखा ‘नळपट्टी’ कर लावल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. नळ नसलेल्या घरांनाही पाचशे रुपयांची नळपट्टी आकारण्यात येत असून, ही वसुली म्हणजे थेट आर्थिक दरोडा असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

या संपूर्ण प्रकरणी भारतीय न्याय संहितेनुसार ठेकेदार कंपनीने बनावट नोंदी करणे, चुकीचे मोजमाप सादर करणे, हेतुपुरस्सर चुकीचे मूल्यांकन सादर करून जनतेची फसवणूक करणे, असा गंभीर गुन्हा केला असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने झालेल्या या आंदोलनात नागरिकांनाही मोठ्या संख्येने पाठिंबा दिला.

यावेळी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, ज्योती चौधरी, डॉ. अनिल पाटील, संदीप सूर्यवंशी, सुभाष मराठे, मुन्ना पठाण,आनंद जावडेकर, आण्णा फुलपगारे, पंकज भारस्कर,कपील लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संदीप चौधरी, सुनील चौधरी, सागर निकम, विकास शिंगाडे,सागर साळवे ,दिनेश पाटील,अजय चौधरी,नितीन देशमुख,अनिल शिरसाट, संजय पाटील,दिनेश गुरव,अमोल ठाकूर, वैभव पाटील, हर्षल वाणी, शुभम रणधीर,अक्षय पाटील,विष्णू जावडेकर, आशुतोष कोळी, गोकुळ बडगुजर, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते

प्रतिनिधी- कार्तिक सोनवणे, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top