दोन हजारांची लाच भोवली : शिरपूर पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भामरे (रा. नरडाणा) व सौरभ राजेंद्र ठाकरे (रा. चोपडा) यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वकवाड येथील 40 वर्षीय शेतकऱ्याला 2023-24 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 50 हजार रुपयांचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित साडेतीन लाखांच्या रकमेकरिता शेतकऱ्याने शिरपूर पंचायत समितीत तांत्रिक सहाय्यक धीरज भामरे यांची भेट घेतली.

त्यावेळी अनुदानाचे बिल मंजूर करण्यासाठी भामरे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप झाला. याबाबत 19 मे रोजी एसीबीकडे तक्रार दाखल झाली. पंचासमक्ष पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागितल्याचे व स्वीकारण्याचे मान्य केल्याने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top