शिंदखेड्यात युरिया खताची तीव्र टंचाई; ठाकरेसेना आक्रमक, प्रशासनाला ७२ तासांचा अल्टीमेटम

शिंदखेडा तालुक्यात सध्या युरिया खताच्या तीव्र टंचाईने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक झाल्याचे चित्र आज शिंदखेडा तहसील कार्यालयात पाहायला मिळाले. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेटवर ठिय्या देत आंदोलन करत तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली.

शिवसेनेच्या वतीने यावेळी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या. यात युरिया खत साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करावा, ग्रामस्तरावर युरिया वितरणासाठी हेल्पलाइन व केंद्र सुरू करावीत, पीओएस मशीनच्या गैरवापराची सखोल चौकशी करण्यात यावी, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्यात यावी यांचा समावेश आहे.

७२ तासांत या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटवर ठिय्या दिला आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवासी तहसीलदार शारदा बागले यांना युरिया टंचाईबाबत निवेदन देत, शेतकऱ्यांना तातडीने खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top