दोंडाईचा: डॉक्टरांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरेसेनेचा इशारा

दोंडाईचा – साहूर (ता. शिंदखेडा) येथील हर्षल बाळकृष्ण कोळी (वय २८) या तरुणाने शेतात तणनाशक फवारणी करत असताना औषध पिऊन घेतल्याची घटना घडली. त्याला तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून आवश्यक तातडीची उपचारप्रक्रिया न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या मते, डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी प्राथमिक उपचार न करता केवळ एक सलाईन लावून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. नंदुरबार येथे डॉक्टरांनी सक्शन पंपद्वारे विषारी औषध काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळ निघून गेल्याने परिस्थिती गंभीर बनली. नंदुरबारच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, दोंडाईचा येथेच तातडीने औषध काढण्याची प्रक्रिया झाली असती, तर हर्षलचा जीव वाचू शकला असता.

यानंतर पुढील उपचार खाजगी रुग्णालयात सुरू असताना, ९ ऑगस्ट रोजी हर्षलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी दोंडाईच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी यांना घेराव घालत जाब विचारला.

यावेळी उध्दवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दोषी डॉक्टरांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top