शिरपूर तालुक्यातील विविध विकासकामे, आरोग्य सेवा, बांधकाम विभागातील पारदर्शकता तसेच आदिवासी व वंचित समाजाच्या मूलभूत हक्कांशी संबंधित तक्रारींवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आज धुळ्यात धरणे आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान आघाडीने अनेक मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये घरकुल योजनेत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात घरे न मिळाल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली. “घरकुल मंजूर असूनही ते फक्त कागदावरच असून, लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
आमच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी ‘अनोख्या पद्धतीने’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची मागणी करण्यात आली आहे.

