धुळे – सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून पॅथॉलॉजी लॅबमध्ये वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील 83 हजार रुपये सायबर पोलिसांनी काही तासांत परत मिळवून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी निदान पॅथॉलॉजी लॅबचे डॉ. प्रशांत देवरे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून, “मी सैन्यातील अधिकारी आहे, आमच्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सामूहिक वैद्यकीय तपासणी करायची आहे” असे सांगत सवलतीच्या दरात तपासणी करण्याची विनंती केली. विश्वास बसल्याने डॉ. देवरे यांनी सुरुवातीला 15,000 रुपये भरले.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने मोबाईल अॅक्सेस घेऊन, एकूण ₹98,969 इतकी रक्कम काढून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. देवरे यांनी तात्काळ सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांनी तातडीने संबंधित बँकेशी संपर्क साधून नोटीस पाठवली आणि काही तासांत 83,000 रुपये त्यांच्या खात्यात परत मिळवून दिले.
सायबर पोलिसांचे आवाहन – ऑनलाईन व्यवहार करताना खात्रीशीर माहिती मिळवल्याशिवाय व्यवहार करू नयेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक तपशील, यूजर नेम, पासवर्ड, OTP, एटीएम/क्रेडिट कार्ड डिटेल्स देऊ नयेत. अज्ञात लिंकवर क्लिक करू नये किंवा APK फाईल डाउनलोड करू नये. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ हेल्पलाईन क्रमांक 1930 वर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करावी.

