नरडाणा : ‘पुष्पा’ स्टाईलने दारू तस्करीचा पर्दाफाश; टँकरमधील गुप्त कप्प्यांतून १ कोटींची दारू जप्त

धुळे पोलिसांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील युक्तीप्रमाणे खाद्यतेलाच्या टँकरमध्ये गुप्त कप्पे बनवून होणारी विदेशी दारूची तस्करी उधळून लावली. स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुंबई–आग्रा महामार्गावर आकांक्षा हॉटेलजवळ ही धडक कारवाई केली.

गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी टाटा कंपनीचा संशयित टँकर अडवून चालक मोहनलाल पुरखाराम जाट (रा. राजस्थान) याची चौकशी केली. सुरुवातीला खाद्यतेल असल्याचा दावा करणाऱ्या चालकावर संशय आल्याने टँकर तपासला असता वेल्डिंग करून बनवलेले सहा गुप्त कप्पे सापडले. गॅस कटरने उघडलेल्या या कप्प्यांपैकी चारमध्ये ३,६०० लिटर (४०० बॉक्स) विदेशी दारू आढळून आली.

एकूण ५५.९६ लाख रुपयांची दारू आणि ४५ लाखांचा टँकर असा १.०९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालकाला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातून ही दारू कोण भरून, गुजरातमध्ये कोणाला पोहोचवली जाणार होती, याचा तपास सुरू असून या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top