कापडणे – कापडणे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असूनही ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित जलजीवन प्राधिकरणाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलकांनी सामुदायिक मुंडन करून जाहीर निषेध व्यक्त केला.
गावात 15 जुलैपासून विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने 16 ऑगस्टपासून भुषण ब्राम्हणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले. पाच दिवस उलटूनही मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आज आंदोलकांनी केस अर्पण करून संताप व्यक्त केला.
आंदोलकांनी सांगितले की, “घरातील जबाबदार व्यक्ती मृत्यू पावल्यावर जसा पाचव्या दिवशी सुतक काढण्यासाठी केस अर्पण केले जातात, त्याचप्रमाणे गावाची जबाबदारी असलेली ग्रामपंचायत व प्रशासन मृत अवस्थेत असल्यासारखे वागत असल्याने आम्ही निषेध म्हणून मुंडन केले.”
दरम्यान, खासदार शोभाताई बच्छाव यांचे जनसंपर्क अधिकारी निलेश काटे, रंजीत राजे भोसले, अतुल सोनवणे, सिद्धार्थ जगदेव, अनिल निकम, शशी वाघ आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. उपोषणकर्त्यांपैकी एका आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
आंदोलकांनी स्पष्ट केले की, मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण कोणत्याही परिस्थितीत थांबविले जाणार नाही.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

