पूररेषेत बांधकाम जमीनदोस्त करण्याचे अभियंत्यांचे आश्वासन
धुळे – साक्री रोडवरील महिंदळे शिवारात पांझरा नदीच्या पात्रात पूररेषेत गॅबियन पद्धतीची प्रचंड भिंत उभी केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता संदीप सोनवणे यांचा घेराव घालत उत्तरदायित्वाची मागणी केली.
महेंद्र हॉटेलच्या मागील बाजूस जवळपास १ किमी लांबीची, ५ मीटर उंचीची व २ मीटर रुंदीची भिंत उभारण्यात आली आहे. हे काम पूररेषेत होत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून शिवसेनेतर्फे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे मुळामुठा नदीतील बांधकामावरील निर्णय तसेच राज्य शासनाचे २०१८ चे परिपत्रक दाखवून नेत्यांनी अधिकाऱ्यांची गाठ घेतली.
नेत्यांनी असा आरोप केला की, पाटबंधारे विभाग, नगररचना विभाग आणि महापालिका यांच्या संगनमताने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा रॉयल्टी कर बुडवला गेला असून, हे राज्य शासनाविरोधातील कटकारस्थान आहे. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला.
दरम्यान, अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच कारवाई केली जाईल, पूररेषेत बांधकाम आढळल्यास ते जमीनदोस्त केले जाईल, असे आश्वासन दिले. पूररेषेचे नकाशे हे शासन व पाटबंधारे विभागाच्या वेबसाईटवर अंतिम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, सुनील पाटील, प्रशांत ठाकूर, अण्णा फुलपगारे, कपिल लिंगायत, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, युवा सेनेचे मनोज जाधव, पंकज भारस्कर, अजय चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

