साक्री तालुक्यात युरिया खताची टंचाई; दोन शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या तत्परतेने जीव वाचला

साक्री तालुक्यात युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संतापाच्या टोकावर पोहोचले आहेत. याच संतापातून दहिवेल बाजारपेठेत दोन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. उपस्थित शेतकऱ्यांच्या जागरुकतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.मिळालेल्या माहितीनुसार, बोधगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी (५४) व डोंगरु बहिरम (३३) हे दिवसभर खतासाठी फिरूनदेखील युरियाची एकही बॅग मिळवू शकले नाहीत. संतापाच्या भरात त्यांनी दहिवेल बाजारपेठेत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र, ते माचीस पेटवण्याआधीच उपस्थित सरपंच विजय अहिरे यांच्यासह आण्णाभाऊ चौरे, तुषार साबळे, विशाल ठाकरे, भैय्या सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत दोघांना रोखले आणि शांत केले.या घटनेमुळे साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेतकरी संघटनांनी युरियाच्या टंचाईवर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून, सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे.सध्या राज्यात व केंद्रात भाजप सरकार असूनही शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top