धुळे : “आदिवासींच्या आरक्षणात काही समूहांची घुसखोरी हा सरकार पुरस्कृत कार्यक्रम आहे,” असा गंभीर आरोप आदिवासी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केला आहे. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.
ढवळे म्हणाले की, “गेली २५ वर्षे आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी आंदोलन करत आहोत. मात्र आज आमच्यासमोर नवी आव्हाने उभी आहेत. ‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ या नीतीप्रमाणे सरकार समाजात भांडणे लावून देत आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्यांना कोणताही संविधानिक आधार नाही अशा मागण्या राजकीय ताकदीच्या जोरावर पुढे रेटल्या जात आहेत. यामुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमण होऊन मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे.
“या घुसखोरीविरोधात आणि आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन ढवळे यांनी केले.

