निजामपूर-जैताणे आदर्श विद्या मंदिरात पालक-शिक्षक संघाची पहिली सभा

निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 2025-26 या शैक्षणिक वर्षातील पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची पहिली सभा उत्साहात पार पडली. या सभेला पालक-शिक्षक संघातील जवळपास 21 पालक सदस्यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक बी. आर. गावित यांनी भूषविले. तर उपमुख्याध्यापक एन. एम. शाह, उपप्राचार्य ए. एस. भदाणे, पर्यवेक्षक एस. एस. शिरसाठ, श्रीमती यू. व्ही. मोरे तसेच पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती सपना सागर भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी अतिथी व कार्यकारिणी सदस्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सचिव एस. एम. मोहने यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. पुढे सदस्य मनोज खारकर, सुशील राणे, हेमंत महाले, शरद पेंढारे, भटू देवरे, जितेंद्र साळुंखे, सोनल जाधव, रत्ना शाह यांनी विविध सूचना व समस्या मांडल्या.

आपल्या मनोगतात उपाध्यक्षा श्रीमती सपना भावसार यांनी पालकांनी मुलांना घरातून शिस्तीचे धडे द्यावेत, तरच ते शाळेतही शिस्तीचे पालन करतील, असे प्रतिपादन केले. शिक्षक प्रतिनिधी श्री एस. एल. सोनवणे यांनी आपले विचार मांडले, तर उपप्राचार्य ए. एस. भदाणे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित पालकांच्या प्रश्नांचे समाधान केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गावित यांनी पालकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करताना शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या डिजिटल बोर्डचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी कसा उपयोग होतो हेही स्पष्ट केले.

या वेळी पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. आभार प्रदर्शन जे. बी. सोनगिरे यांनी केले, तर समिती सदस्य मंगेश जाधव यांनी कार्यभार सांभाळला. शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली.
-प्रतिनिधी हेमंत महाले, निजामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top