प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेवर शिवसेनेची एकमेव हरकत; धुळे महानगरप्रमुख धीरज पाटील यांची ठाम भूमिका

धुळे शहरातील प्रभाग रचनेबाबत नोंदवलेल्या हरकतींमध्ये शिवसेना (ठाकरे गट) चे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी मांडलेली एकमेव हरकत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रमुख रस्ते, पूल व सार्वजनिक स्थळांच्या स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या दीर्घकालीन तक्रारी लक्षात घेऊन पाटील यांनी प्रशासनापुढे मुद्दा ठामपणे उपस्थित केला आहे.

सध्या असलेल्या १९ प्रभागांच्या चौथ्या सीमेला जोडणाऱ्या लगतच्या प्रभागांचे प्रमुख रस्ते व स्थळे हे स्वतंत्रपणे सीमारेषेवरच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या भागातील स्वच्छता व विकासकामे नेमक्या कोणत्या प्रभागातून व्हावीत, याबाबत नेहमीच गोंधळ निर्माण होत असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणले. याच कारणामुळे नागरिकांना स्वच्छतेपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत देखील अशीच प्रभागरचना करण्यात आली होती. त्यावेळी अनेक प्रमुख रस्ते व महत्त्वाची प्रतिष्ठाने प्रत्यक्ष प्रभागात न समाविष्ट करता सीमारेषेवरच ठेवण्यात आली होती. नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांनी वारंवार सूचना करूनही या स्थळांचा विकासात समावेश होऊ शकला नव्हता. परिणामी अनेक भाग दुर्लक्षित राहिले होते.

या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत अशा सर्व १९ प्रभागांतील चौथ्या सीमेला जोडणारे प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणे त्या त्या प्रभागात समाविष्ट करावीत, अशी ठोस हरकत धीरज पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या हरकतीमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. प्रभागांच्या विकासाचे नियोजन करताना सार्वजनिक सोयीसुविधा आणि स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, असा जनतेचा सूर असून, पाटील यांची ही भूमिका प्रशासनासाठी आत्मपरीक्षणाची संधी ठरू शकते, असे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top