साक्री पंचायत समिती ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी’ सज्ज

साक्रीतील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरू केले आहे. या अभियानांतर्गत कामगिरीच्या आधारे अव्वल गुण मिळवणाऱ्या संस्थांना १५ लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंतचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळेच या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागात सुशासन रुजवणे, पारदर्शकता वाढवणे, स्वच्छतेला चालना देणे, जल व्यवस्थापनात स्वावलंबन निर्माण करणे, आर्थिक प्रगती साधणे आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे. साक्री तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी काटेकोर नियोजन करून ग्रामपातळीपर्यंत संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा ठरविण्यात आला आहे. यात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे हे घटक समाविष्ट आहेत.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती साक्री अंतर्गत प्रचार व प्रसिद्धी पथक, समन्वय पथक आणि नियोजन पथक स्थापन करण्यात आले असून अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून साक्री कार्यालयात विशेष संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामविकासाच्या प्रयत्नात एकही घटक वंचित राहू नये आणि प्रत्येक समाजघटकाचा सक्रिय सहभाग असावा, असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी केले आहे.

प्रतिनिधी- निलेश सावळे
झेप मराठी साक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top