आदिवासींमध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरणार

धनगर, बंजारा समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये; आदिवासी टायगर सेना आक्रमक

महाराष्ट्रातील आदिवासी समाज आपले मुलभूत हक्क व संविधानाने दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करीत आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीप्रमाणे आणि 1950 च्या राष्ट्रपती आदेशानुसार अनुसूचित जमातींना आरक्षणाचा लाभ देण्यात आला आहे. या आदेशात कोणत्या जमाती आदिवासी म्हणून मान्य आहेत, याचा स्पष्ट उल्लेख आहे.

तथापि, अलीकडच्या काळात धनगर व बंजारा समाज हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न आदिवासी समाजाच्या अधिकारांवर गदा आणणारा असून याला कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही, असे आदिवासी टायगर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. आरक्षणातील घुसखोरी तातडीने थांबवावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. आदिवासी टायगर सेनेचे म्हणणे आहे की, “आदिवासींसाठी असलेले आरक्षण हे त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक दरी भरून काढण्यासाठी आहे. त्यात इतर समाजांना घुसवण्याचा प्रयत्न म्हणजे अन्यायकारक निर्णय ठरेल.”

आगामी काळात जर शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर व्यापक स्तरावर आंदोलने करण्यात येतील, असा इशारा देत संघटनेने सरकारला सज्जड इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top