साक्रीतील सेतू केंद्रांमध्ये अवाजवी फी आकारणी; ग्राहक पंचायतची तहसीलदारांकडे तक्रार

साक्री तहसील अंतर्गत कार्यरत असलेल्या सेतू केंद्र चालकांकडून नागरिकांकडून दाखले व शासकीय कागदपत्रांसाठी अवाजवी फी आकारली जात असल्याचा गंभीर आरोप ग्राहक पंचायत महाराष्ट्रने केला आहे. या संदर्भात तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.

ग्राहक पंचायतच्या साक्री शाखेकडे आलेल्या तोंडी तक्रारी व व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे नागरिकांनी सांगितले की, दाखल्यांसाठी १०० रुपये किंवा त्याहून अधिक शुल्क आकारले जात आहे. दरपत्रकाविषयी विचारणा केल्यास नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, इतकेच नव्हे तर काही वेळा त्यांच्याशी उध्दट वर्तन केले जाते, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष बी. एम. भामरे, सचिव बिलास देसले, जिल्हा सहसंघटक पी. झेड. कुबर, तालुका संघटक विजय भोसले तसेच सुरेश पारख, सतीश पेंढारकर, दिनेश बोरसे, दिलीप नांद्रे व ए. पी. दशपुते यांनी सही केलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात सेतू केंद्रांवर दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून सामान्य नागरिकांची लूट होणार नाही. तसेच अवाजवी शुल्क आकारणाऱ्या केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

निलेश सावळे,
साक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top