धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या साक्री तालुक्यातील जैताणे गावात ग्रामदैवत आई भवानी देवीच्या नवरात्र उत्सवला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. या नवरात्र काळात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, नवसपूर्ती, आरत्या आणि सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण भक्तिमय होऊन जाईल.
रोहिणी नदीकाठी वसलेले आई भवानी देवीचे हे भव्य आणि जागरूक देवस्थान शेकडो वर्षांपासून यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर जिर्णोद्धार समिती, नवरात्र उत्सव समिती आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने मंदिर परिसर नव्याने सजविण्यात आला असून, भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेची सुरुवात घटस्थापना आणि मानाचा ध्वजारोहण करून केली जाणार आहे. या नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविला गेलाय तर मंदिरासमोरील प्रशस्त प्रांगणात खुल्या गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे भाविकांना सांस्कृतिक आणि धार्मिक आनंदाचा अनुभव घेता येईल. तसेच भाविकांसाठी विविध पाळणे, खेळणी आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटली जाणार आहेत. पंचमी, सप्तमी आणि अष्टमीच्या दिवशी चक्रपूजा, दुर्गा अष्टमीचे पठण तसेच विविध आरत्या केल्या जाणार आहेत. याशिवाय सामाजिक नृत्यप्रदर्शन आणि देवी-देवतांच्या झाक्यांची भव्य सादरीकरणदेखील करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील प्रतिष्ठित भाविकांना सहपत्नी आरतीस मान देण्यात येणार असून, या आरतीसाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होत असते. नवरात्र व कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी विशेष आकर्षण असून, दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसर गजबजून जातो. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून समिती सदस्य, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने परिश्रम घेत आहेत. तसेच, यात्रेदरम्यान सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यासाठी निजामपूर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
प्रतिनिधी- हेमंत महाले
निजामपूर
