बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

शिरपूर तालुक्यातील वाडी गावात बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उध्वस्त करण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किस्मत भगवान कोळी (वय ४९) याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्याचा मुलगा समाधान कोळी फरार झाला आहे.

गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) दुपारी १.४५ वाजता किस्मत कोळी यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. या वेळी घराच्या मधल्या खोलीत दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्यामध्ये स्पिरीटचे कॅन, रिकाम्या प्लास्टिक व काचेच्या बाटल्या, झाकणं तसेच दारू तयार करणारे मशीन असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. प्राथमिक चौकशीत किस्मत कोळीने कबुली दिली की, त्याचा मुलगा समाधान कोळी हा स्पिरीटपासून ‘टॅगो’ व ‘सखु संत्रा’ या नावाने बनावट देशी दारू तयार करून स्थानिक पातळीवर विक्री करतो. या बनावट दारूच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले.

या प्रकरणी किस्मत भगवान कोळी याला अटक करण्यात आली असून समाधान कोळी फरार आहे. त्यांच्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १२३ व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा तपास पोउनि हेमंत खैरनार करीत आहेत.

हि कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदीप दरवडे, पोउनि हेमंत खैरनार तसेच कॉनस्टेबल रविंद्र आखडमल, सुनील जावरे, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटु साळुंके, उमेश पवार, गोपाल माळी, सुशिल पाटील, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ व होमगार्ड मिथुन पवार यांनी केली.

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top