धुळे शहरात सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा; शकुंतला फाउंडेशनची मागणी

धुळे शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा असलेल्या ‘सुभाष चौकात’ आता पूर्णाकृती पुतळा उभारावा, या मागणीसाठी शकुंतला फाउंडेशनतर्फे धुळेकरांनी ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहरातील जुना अमळनेर स्टॅन्ड परिसरात उभारलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्धाकृती पुतळा हे गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या अभिमानाचे प्रतीक मानले जाते. या परिसराला ‘सुभाष चौक’ म्हणून लोक ओळखतात. मात्र, नेताजींसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाला खरी आदरांजली द्यायची असेल तर येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. या मागणीसाठी शकुंतला फाउंडेशनतर्फे सोमवारी ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत शहराच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. “अर्धाकृती पुतळ्याने नेताजींचे कार्य मोजके दिसते, पण पूर्णाकृती पुतळा हे त्यांच्या त्याग व पराक्रमाचे जिवंत स्मारक ठरेल,” असे मत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या संदर्भात जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनी “धुळेकरांचा न्याय्य मागणीचा प्रश्न गांभीर्याने विचारात घेतला जाईल आणि लवकरच तो मार्गी लागेल,” असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, पुतळा उभारणीच्या मागणीने शहरात नवा चर्चेचा विषय निर्माण केला असून, “नेताजींच्या पूर्णाकृती पुतळ्याशिवाय सुभाष चौकाचे सुशोभीकरण अपूर्ण राहील” असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top