आदिवासी हक्क, शेतकरी प्रश्न आणि आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी साक्री शहरात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या मोर्चामुळे संपूर्ण साक्रीकरांचे लक्ष वेधले गेले.
मोर्चाची सुरुवात आशापुरी मंदिरापासून झाली आणि तो तहसील कार्यालयावर धडकला. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनींनी सहभाग घेतला. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसील प्रशासनाला तब्बल ५२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून सर्वांना सातबारा देण्यात यावा. मेंढपाळांकडून आदिवासींवर होणारे हल्ले व अत्याचार थांबवावेत. धनगरसह इतर कोणत्याही समाजाला आदिवासी आरक्षण दिले जाऊ नये. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. वनविभागाचे वनदावेदारांवर होणारे अन्याय-अत्याचार थांबवावेत. कापसावरील आयात शुल्क पुन्हा पूर्ववत करावे. दुध, सोयाबीन, तुरसह सर्व पिकांसाठी एम.एस.पी. गॅरंटी कायदा करण्यात यावा. संविधानातील आदिवासींच्या यादीत इतर समाजाची घुसखोरी रोखावी यांसारख्या मागण्यांचा समावेश होता.
मोर्चात कॉ. वंजी गायकवाड, कॉ. यशवंत माळचे, कॉ. बंडू माळचे, कॉ. किशोर ढमाले, मेरुलाल पवार, जितेंद्र पवार, दिलीप गावित, आर.टी. गावित, मन्साराम पवार, निलाबाई खांडेकर, रमण माळवी, दिलीप गावित, रणजित गावित, अशपाक कुरेशी, पवित्राबाई सोनवणे, विरसिंह माळचे, जिवन गावित, दंगल माळचे, उत्तम महिरे, कॉ. शरद पवार, धर्मा सोनवणे, सुशिल राऊत, राकेश भोसले, रविंद्र बागुल यांच्यासह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रतिनिधी- निलेश सावळे,साक्री
