साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेत सभासदांनी अनेक मुद्दे उपस्थित केले, तर सत्ताधारी गटाने पारदर्शक कारभाराचे प्रतिपादन केले. या बैठकीत संघाच्या उत्पन्न-खर्चाचा तपशील सादर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे हे होते.या सभेत काही सभासदांनी “केवळ ठरावीक लोकांचेच सततचे बोलणे ऐकण्यासाठी आम्ही बैठकीला येतो का?” असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, संस्थेचे सचिव दीपक साळुंखे यांनी संघाच्या प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी विरोधी गटाकडून अंदाजपत्रक, ताळेबंद तसेच मागील इतिवृत्ताबाबत आक्षेप घेण्यात आले. व्यापारी गाळ्यांच्या निविदेवरही विरोधकांनी आक्षेप नोंदवला. या संदर्भात चेअरमन शिरीष सोनवणे यांनी विरोधकांनी मांडलेली सर्व मते इतिवृत्तात नोंदवली जातील, असे आश्वासन दिले. तसेच विद्यमान सत्ताधारी गट संघाला नफ्यात आणण्यासाठी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेला उपाध्यक्ष प्रदीप नांद्रे, संचालक उमाकांत पाटील, अनिल शिंदे, दिनेश सोनवणे, विजय बागुल, श्रीमती विमलबाई अहिरराव, संध्या अकलाडे, उल्केश देसले, विलास देसले, नैनेश भामरे, ऍड. नरेंद्र मराठे, शशिकांत भामरे, अबुअली पिंजारी आदींसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. आर्थिक अहवालात शॉपिंग भाडे ११ लाख ५० हजार, गोडाऊन भाडे ६ लाख ५० हजार, बँक व्याज १ लाख ८७ हजार ४००, धान्य मार्जिन ३ लाख ७६ हजार ५००, मार्केटिंग फेडरेशन कमिशन १ लाख ३५ हजार, डिव्हिडंड १० हजार व व्यापारी नफा २ लाख २५ हजार ३५० रुपये असल्याचे सादर करण्यात आले तसेच सभेचे सूत्रसंचालन विजय भोसले यांनी केले, तर आभार प्रदीप नांद्रे यांनी मानले.
प्रतिनिधी- निलेश सावळे, साक्री
