शिस्तबद्ध पथसंचलनातून देशभक्तीचा संदेश
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निजामपूर-जैताणे शहरात संघाच्या स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध आणि दिमाखदार पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या संचलनामुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
संध्याकाळच्या वेळी पारंपरिक गणवेशात स्वयंसेवकांनी डोक्यावर टोपी, हातात दंड आणि नगार्याच्या गजरात गावातील प्रमुख मार्गांवरून संचलन काढले. संचलनाची सुरुवात ग्रामदैवत आई भवानी मंदिरापासून झाली. त्यानंतर शिवाजी चौक, फरशी मार्ग, वाणी कार्यालय, राजखांब, संतसेना चौक, हनुमान चौक, गांधी चौक, भगवा चौक, मेन रोड, साक्री-नंदुरबार-अहमदनगर मार्ग, तसेच जैताणे ग्रामपंचायत, बिरोबा मंदिर, अहिल्यादेवी मंदिर, मेढपाळ चौक, मल्हार चौक, संत सावता चौक आणि चावडी चौक मार्गे संचलन करत भवानी मंदिर प्रांगणात समारोप करण्यात आला.
पथसंचलनाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघ परिवार आणि नागरिकांकडून फुलांचा वर्षाव करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.
संचलनानंतर आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. छोटू भदाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळे जिल्हा कार्यवाह जितेंद्र पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात संघ कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय ऐक्य, शिस्त आणि समाजसेवेचा संदेश दिला.
या पारंपरिक पथसंचलनामुळे संपूर्ण गावात उत्साह, शिस्त आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. महिला स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ऐक्य आणि समाजभावनेचा संदेश प्रभावीपणे उमटला.
-प्रतिनिधी हेमंत महाले, निजामपूर

