धुळे रेल्वे स्थानकावर ‘अमृत संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रवाशांकडून मिळालेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार : विभागीय व्यवस्थापक अग्रवाल

भारतीय रेल्वेद्वारे राबविण्यात येत असलेल्या “विशेष अभियान 5.0” अंतर्गत भुसावळ विभागातील धुळे रेल्वे स्थानकावर आज “अमृत संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानकावरील पुनर्विकास कामांचा आढावा घेणे, प्रवासी सुविधांचा आकलन करणे आणि नागरिक व प्रवाशांकडून थेट सूचना घेणे असा होता.

कार्यक्रमादरम्यान भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनीत अग्रवाल यांनी प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी सांगितले की धुळे रेल्वे स्थानकाचा “अमृत स्टेशन योजना” अंतर्गत व्यापक आधुनिकीकरण करण्यात आले असून येथे नवीन प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, नव्याने उभारलेले प्लॅटफॉर्म शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आकर्षक सौंदर्यीकरण, सर्क्युलेटिंग एरिया, कोच मार्गदर्शन प्रणाली, दिशादर्शक फलक तसेच “एक स्टेशन एक उत्पाद” स्टॉल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या वेळी प्रवासी, नागरिक आणि रेल्वे अधिकारी यांच्यात प्रवासी सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली. स्थानिक रेल्वे सल्लागार समिती सदस्य नितीन ठाकूर यांनी अमृत भारत योजनेत धुळे स्टेशनचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार डॉ. सुभाष भामरे तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. त्यांनी स्टेशनचा बदललेला चेहरा समाधानकारक असल्याचे सांगत त्याच्या देखभालीकडे (मेंटेनन्स) नियमित लक्ष देण्याची मागणी केली.

तसेच त्यांनी धुळे शहरातील विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी धुळे–पुणे रेल्वे सेवा सुरू करावी, धुळे–मुंबई रेल्वेची वेळ रात्रीची ठेवावी, तसेच अनावश्यक थांबे कमी करून प्रवासाचा कालावधी कमी करावा, अशी मागणी केली. याशिवाय धुळे–चाळीसगाव पॅसेंजर सेवा रविवारी देखील सुरू ठेवावी आणि धुळे शहराला मराठवाडा, संभाजीनगर, नाशिक व कसारा पर्यंत जोडणाऱ्या रेल्वे सेवा वाढवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी गुरुद्वारा परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाची गरज व्यक्त केली, कारण सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या ॲम्बुलन्स व प्रवाशांना वारंवार रेल्वे क्रॉसिंगमुळे अडथळा येतो, अशी तक्रार त्यांनी केली.

या प्रसंगी मनसेचे अजित राजपूत, भाजप रेल्वे आघाडीचे असिफ, अभिजात जोशी, विशाल स्वामी आदी उपस्थित होते. प्रवाशांनी त्यांच्या समस्या मांडत उपयुक्त सूचना दिल्या.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. अग्रवाल यांनी सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार केला जाईल आणि त्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी, स्थानकप्रमुख, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रेल्वे सेवेला अधिक प्रवासी-मैत्रीपूर्ण आणि सुलभ बनवण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

  • प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top