ग्लोबल हॅंडवॉशिंग डे साजरा : निजामपूर-साक्रीतील 887 विद्यार्थ्यांचा सहभाग‘सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर ५’ प्रकल्पांतर्गत उपक्रम

निजामपूर (ता. साक्री) — जागतिक हॅंडवॉशिंग डेच्या निमित्ताने निजामपूर येथील इंदिरा गांधी माध्यमिक कन्या विद्यालय, आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ विद्यालयात एकत्रितपणे स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल 887 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हा उपक्रम प्लॅन इंडियाच्या ‘सेल्फ केअर फॉर न्यू मॉम्स अँड किड्स अंडर ५’ या प्रकल्पांतर्गत रेकिटच्या सहकार्याने, तसेच धुळे जिल्हा शिक्षण, आरोग्य आणि आयसीडीएस विभागांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘वर्ल्ड स्टुडंट्स डे’ म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, मुख्याध्यापिका आर. एम. ठाकरे, उपमुख्याध्यापक नितीन मणिलाल शाह, वरिष्ठ शिक्षक एस. एस. शिरसाठ आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे म्हणाले,

“आज आपण फक्त एक दिवस साजरा करत नाही, तर एक चांगली सवय आत्मसात करत आहोत जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आजारांपासून संरक्षण देईल. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांचे आरोग्य हा त्या भविष्याचा पाया आहे.”

विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात हात धुण्याच्या 6 पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व समजून घेतले.
शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मिळून स्वच्छतेचा संदेश देणारे घोषवाक्ये दिली.

शाळेच्या प्रमुखांनी सांगितले,

“प्लॅन इंडिया आणि रेकिट यांच्या सहकार्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व शिकवले जात असून ते त्यांच्या समाजातील ‘स्वच्छतेचे चॅम्पियन’ बनतील.”

कार्यक्रमाचे समन्वयन प्लॅन इंडिया टीमने केले असून आयसीडीएस, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पार पडला.

ग्लोबल हॅंडवॉशिंग डे हा दिवस स्वच्छतेच्या सवयी आणि सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठीच्या सोप्या व प्रभावी उपायांची आठवण करून देतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यपूर्ण जीवनशैलीची जाणीव निर्माण झाली असून, ते त्यांच्या समुदायात स्वच्छतेचे राजदूत म्हणून कार्य करतील.

-प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top