लोकप्रतिनिधींचे अनोख्या पद्धतीने मानले विशेष आभार…
धुळे | तालुक्यातील वडजाई-सौंदाणे ते बाबुळवाडी मार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला असून, रस्त्याची चाळण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि धूळ यामुळे ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदारांपर्यंत तक्रारी केल्यानंतरही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची निविदा निघून संपूर्ण एक वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर निशाणा साधत ‘विशेष आभार’ आंदोलनाचे आयोजन केले. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना धन्यवाद देत संताप व्यक्त केला.
“या आंदोलनातून तरी लोकप्रतिनिधी जागे होतील आणि रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
धुळे तालुका प्रशासन आणि संबंधित विभागाकडून मात्र या आंदोलनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

