धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार निलंबित; टोल नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ

धुळे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार मुकेश यशवंत वाघ (पोहवा/१३‍०४) यांना शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. धुळे-चाळीसगाव रोडवरील बोरविहीर पथकर नाक्यावर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालून पथकर कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

घटना कशी घडली?
२५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.१९ वाजता ही घटना घडली. बोरविहीर टोल नाक्यावरून MH-०४-FF-१३८०, MH-१२-KE-४८०८ आणि MH-०२-CZ-८२५८ ही तीन वाहने जात असताना टोल वसुलीच्या वेळी वाहनातील व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी वाद घालत गोंधळ माजवला. या दरम्यान नाका प्रशासनाच्या कंपाउंडची भिंत तोडून नुकसान केल्याचे टोल व्यवस्थापक पुष्पेंद्रसिंग यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

यानंतर टोल कर्मचारी सारांश भावसार यांनीही व्हॉट्सअॅपद्वारे पोलिसांना माहिती दिली. चौकशीत हा गोंधळ स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी मुकेश वाघ, त्यांचा भाऊ आणि काही नातेवाईकांनी केल्याचे उघड झाले.

शिस्तभंगाची कारवाई
स्वतः पोलिस दलात कार्यरत असतानाही सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत बेशिस्त वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका वाघ यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २५ आणि मुंबई पोलीस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ च्या कलम ३(१)(अ)(ब) नुसार त्यांना तत्काळ शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाच्या अटी
निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, धुळे येथे राहील. दररोज राखीव पोलिस निरीक्षकांकडे उपस्थिती दाखवावी आणि दर शुक्रवारी परेडवेळी मैदानात हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

या काळात त्यांना नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता मिळेल. मात्र, खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यावसायिक कृतीत सहभागी झाल्यास ती गैरवर्तन समजली जाईल आणि त्यावरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कठोर कारवाईचा संदेश
या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, उच्च अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाच्या बाबतीत कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top