२५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींनी उजळले निजामपूर-जैताणे

निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता दहावी (सन १९९८-१९९९) च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २५ वर्षांनंतर स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाने शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा मिळाला तर अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही दाटले.

या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समितीचे अध्यक्ष अंजीचंद्र शाह होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.आर. गावित, उपमुख्याध्यापक नितीन शाह, तसेच डि.जे. वाणी, के.ओ. लाडगे, शिवाजी पाटील, जयवंत कासार, पाटकर सर, जोशी सर, मनोहर राणे, विसपुते सर, पी.जे. शाह, व्ही.के. सोंन्जे, मिनाक्षी ठाकरे, आर.एच. जाधव, कौस्तुभ चिंचोले आदी शिक्षकांसह कर्मचारी राजेश बेडसे, गिरीश जाधव, बंडू शिपाई, राजेंद्र शिरसाठ, रवींद्र पगारे, गोकुळ बदामे उपस्थित होते.

पंचेचाळिशीकडे झुकलेले माजी विद्यार्थी आपले वय, पद, प्रतिष्ठा आणि कामाचा व्याप विसरून बालपणाच्या आठवणीत रमले. दीर्घ काळानंतर भेट झाल्याने सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत भावनिक क्षण अनुभवले.

या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. शाळेतील दिवंगत मित्रांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबरोबरच, गरजू सवंगड्यांना सानुग्रह मदत देण्याचा निर्धार करण्यात आला. यापुढेही कोणत्याही मित्राला आधाराची गरज भासल्यास सर्व जण एकत्र येऊन मदतीचा हात देणार असल्याचे ठरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र पवार यांनी केले, तर प्रस्ताविक अभिजीत पाटील यांनी सादर केले. स्थानिक मित्रांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जबाबदारीने पार पाडले. शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी पितळी समई भेट देऊन आपली भावना व्यक्त केली.

या स्नेहमेळाव्याने शिक्षक-शिष्य नात्याला आणि जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत, बंधुभाव आणि मैत्रीचा अनोखा संदेश दिला.

-प्रतिनिधी हेमंत महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top