साक्री तालुक्यातील इच्छापूर येथे केवळ १४ वर्षीय रूपाली सरक या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा, या मागणीसाठी भाजपा साक्री तालुका महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, माहीर (ता. साक्री) येथील रूपाली सरक ही यात्रेनिमित्त इच्छापूर येथे २२ ऑक्टोबर रोजी गेली होती. त्याचवेळी काही तरुणांनी तिचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला होता. इच्छापूर गावापासून काही अंतरावर, राजस्थानी हॉटेलजवळ रूपालीचा मृतदेह आढळला. घटनेच्या स्वरूपावरून अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने प्रकरण “अपघात” म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या निषेधार्थ २५ ऑक्टोबर रोजी हजारोंच्या संख्येने साक्री शहरातून मोर्चा काढण्यात आला, ज्यात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि राजकीय नेते सहभागी झाले. आंदोलकांनी “रूपालीला न्याय मिळालाच पाहिजे” अशी ठाम मागणी केली.
यानंतर २९ ऑक्टोबर रोजी भाजपा साक्री तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. पूनम काकुस्ते-शिंदे यांनी शीतल साळुंके, करूणा पाटील, रेखा सुर्यवंशी, सपना माळचे आदींसह पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन व्यक्त केले. तसेच आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगत, पीडितेला न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.
प्रतिनिधी निलेश सावळे

