धुळे शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था आणि महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. ‘भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे’ या घोषवाक्याखाली झालेल्या या आंदोलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
सध्या शहरात सुरू असलेल्या बे-मोसमी पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य अधिकच वाढले असून, गणपती रोड, स्टेशन रोड, फाशी पुल, दसेरा मैदान, पारोळा रोड, देवपूर, शिवतीर्थ, चाळीसगाव रोड, कृषी महाविद्यालय परिसर अशा प्रमुख भागांतील रस्ते अतिशय खराब अवस्थेत आहेत. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक वाहनचालक अपघातग्रस्त व जखमी होत आहेत.
शिवसेना उबाठा पक्षाने आरोप केला की, धुळे महानगरपालिकेने रस्त्यांच्या कामांसाठी शेकडो कोटींचा निधी खर्च केला असला तरी कामे दर्जाहीन व भ्रष्टाचारयुक्त पद्धतीने करण्यात आली. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली, त्यामुळे आज शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचा आरोप करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख धीरज पाटील आणि प्रशांत भदाणे यांनी केले. यावेळी प्रशांत ठाकूर, अण्णा फुलपगारे, डॉ. अनिल पाटील, शिवाजी शिरसाळे, दिनेश पाटील, कपिल लिंगायत, विष्णू जावडेकर, अनिल शिरसाट, नितीन देशमुख, योगेश पाटील, आशुतोष कोळी, सचिन शिंदे, चंद्रशेखर शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान महानगरपालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि टक्केवारीच्या भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध व्यक्त करण्यात आला. नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत शहरातील रस्त्यांची दुरवस्था तातडीने दूर करण्याची मागणी केली.

