साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि साक्री तालुका निसर्ग मित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात “एक पेड माॅ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाचार ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून साक्री वनपरिक्षेत्राचे आर.एफ.ओ. विनायक खैरनार, निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले, संस्थेचे विश्वस्त प्रा. एल.जी. सोनवणे, निसर्ग मित्र समितीचे मार्गदर्शक व प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ पारख, निसर्गप्रेमी सौ. प्रतीमा मंदार कुलकर्णी, तसेच समितीचे तालुकाध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य बी.एम. भामरे, उपाध्यक्ष नरेंद्र पगारे, सचिव सी.जी. भामरे, सदस्य मिलींद नांद्रे आणि विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. यानंतर विलास देसले, सुरेशभाऊ पारख, व प्रा. एल.जी. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वर्गातील झाडांची जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रभाकरदादा चौधरी आणि आर.एफ.ओ. विनायक खैरनार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शाळा जशी विद्यार्थ्यांना घडवते, तशीच ही झाडे मोठी करून ती समाजासाठी उपयुक्त बनवा. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन, फळं, फुलं, छाया आणि जीवनासाठी आवश्यक घटक मिळतात.” त्यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत सर्वांना पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.एम. भामरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव सी.जी. भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी नेरे, अंजली बागुल, जयश्री झगडे, राजश्री देवरे, पुनम देवरे, स्वाती गांगुर्डे, विद्या बाविस्कर, तसेच शिक्षकेतर भगिनी कल्पना सोनवणे आणि वैशाली बहिरम यांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी विद्यालयाच्या आवारात नीम, वड, फुलकेसर, कुंदन, बदाम अशा विविध प्रजातींची एकूण वीस झाडे लावण्यात आली असून, प्रत्येक वृक्षास संरक्षणासाठी ट्री गार्ड बसविण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाची दिशा दाखवणारा हा उपक्रम समाजातील प्रत्येक नागरिकाने अंगीकारण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
