धुळ्यातील देवपूरमध्ये दहशत माजवणारी ‘चित्ते’ टोळी जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा कारवाईचा बडगा

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील देवपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात *‘चित्ते टोळी’*वर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगल, विनयभंग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या या टोळीमुळे परिसरातील शांतता धोक्यात आली होती. नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाचा विचार करून पोलिस प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे.

देवपूर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाची सखोल चौकशी केल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत आपले अधिकार वापरून टोळीतील प्रमुख सदस्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार राजेश चित्ते, रामेश्वर चित्ते, गोविंद चित्ते, साहिल चित्ते आणि तरुणकुमार चित्ते या पाचही सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे देवपूर परिसरात आणि संपूर्ण शहरात कायदा-सुव्यवस्थेचा संदेश गेला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे अधोरेखित झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, “पोलिसांनी वेळेवर कठोर पावले उचलल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top