छडवेल–कोर्डे येथे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील स्मृतिदिनानिमित्त भव्य आरोग्य निदान शिबिर

पंचक्रोशीतील 1100 हून अधिक रुग्णांची तपासणी

साक्री तालुक्यातील छडवेल–कोर्डे येथे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत रोगनिदान व उपचार शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहिर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नंदूरबार, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी आणि कांतीलक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या या शिबिरात पंचक्रोशीतून सुमारे 1100 हून अधिक गोरगरीब रुग्णांची तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. वाय. जे. महाले यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्य आयोजक प्राचार्य बी. एस. (दादा) पाटील यांच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करताना म्हटले की,
“वयाच्या 80व्या वर्षीही समाजासाठी अशा प्रकारची निष्ठा आणि ऊर्मी ठेवणारी माणसे भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.”

कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष परागदादा बेडसे होते. तसेच उत्तमराव बोरसे, एल.बी. मोरे, उज्ज्वलामाई बेडसे, प्राचार्य पी.झेड. कुवर, प्रा. एल.जी. सोनवणे, डॉ. दीपक अंधारे, डॉ. सी.डी. महाजन यांच्यासह विविध तज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते.

गोरगरीबांसाठी उपकारक उपक्रम

शिबिराच्या प्रास्ताविकात प्राचार्य बी.एस. दादा पाटील यांनी शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि सामाजिक योगदानाचा उल्लेख केला. गावातील गरजूंसाठी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी म्हणून हे शिबिर घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंचक्रोशीतील मोठा सहभाग

आमखेल, बासर, वाल्हेव, पांगण, कायटेक, शिंदबन, वसंतनगर, इसर्डे, पेटले, ब्राह्मणवेलसह छडवेल–कोर्डे परिसरातून आलेल्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले.
पहिले रुग्ण लक्ष्मण रामा अहिरे यांच्यावर उपचार करून शिबिराची सुरुवात झाली.

‘दवा’सोबत ‘दुवा’ही मिळाला

मोफत तपासणी आणि उपचार मिळाल्याने रुग्णांच्या समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. उपस्थित डॉक्टरांनीही उत्साहाने सेवा देत शिबिर यशस्वी केले.

कृतज्ञतेचा वर्षाव

कार्यक्रमाचे अध्यक्ष परागदादा बेडसे यांनी आयोजकांचे कौतुक करताना सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले.
समारोपाच्या वेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक अंधारे यांनी सर्व मान्यवर, डॉक्टर, सहभागी रुग्ण आणि स्वयंसेवकांचे आभार मानले.

ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि विविध संस्थांच्या पुढाकारामुळे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.

प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top