स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोंडाईचा पोलिसांतर्फे मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, उमेदवारांच्या अर्ज प्रक्रियेदरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणताही अनावश्यक अनुशासनभंग किंवा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे या मॉक ड्रिलमधून स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ५ ते ६ या वेळेत अचानक जमलेल्या जमावाला कसे नियंत्रीत करायचे, मतदान केंद्रे, मतपेटी वाटप किंवा मतमोजणी स्थळी गोंधळ उडाल्यास त्यावर तातडीने प्रतिसाद कसा द्यायचा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या मॉक ड्रिलमध्ये पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्यासह ५ अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी तसेच शिरपूर उपविभागातील आरसीपी पथकातील अंमलदार सहभागी झाले.
याअंतर्गत नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन, जमाव नियंत्रण तंत्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अवैध धंद्यांवरील कारवाईचे अनुकरण करून निवडणुकीदरम्यान उद्भवू शकणाऱ्या परिस्थितींचा आढावा घेण्यात आला.
मॉक ड्रिलमुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांची तयारी अधिक मजबूत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-प्रतिनिधी समाधान ठाकरे

