चार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार-हत्येप्रकरणी साक्री सुवर्णकार समाजाचा तीव्र निषेध; दोषींना फाशीची मागणी

साक्री (प्रतिनिधी) – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर करण्यात आलेल्या अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर संतापून उठला आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, यासंदर्भात साक्री शहर सुवर्णकार समाज, कारागीर आणि समाज बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणी तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना सुवर्णकार समाजाच्या शेकडो महिला-पुरुषांनी मूक मोर्चा काढत निवेदन दिले. यामध्ये आरोपीवर कठोर आणि त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

घटनेतील बालिका सुवर्णकार समाजातील असल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. निरागस मुलीवरील अमानुष अत्याचारामुळे सामान्य नागरिक, महिला आणि तरुणींमध्येही भीती आणि खळबळ उडाली आहे.

हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन तर्फे सखोल, जलद आणि निपक्षपाती तपास करून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकरणांतील दोषींना तात्काळ कठोर शिक्षा झाल्यासच समाजातील वाढत्या बालक अत्याचारांना आळा बसेल, असे मत सुवर्णकार महिलांनी व्यक्त केले.

मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या मूक मोर्चाच्या माध्यमातून समाजाने प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

-प्रतिनिधी निलेश सावळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top