धुळे तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी उधळून लावली. १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता महामार्ग क्रमांक ३ वरील सोनगीर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचला होता.
दरम्यान, गुडगावकडून धुळ्याकडे येणारा एक कंटेनर संशयित वाटल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तपासात कंटेनरमध्ये पाच मोठ्या बॉक्समध्ये सुमारे १९५ किलो वजनाचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या तंबाखूची किंमत तब्बल १ लाख १७ हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी कंटेनर (किंमत सुमारे १५ लाख रुपये) आणि तंबाखू असा एकूण १६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, तपास अधिकारी रवींद्र बागुल आणि त्यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
-प्रतिनिधी कार्तिक सोनवणे

