आदिवासी विकास विभागातील प्रकल्पस्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा उत्साहात पार — १५४५ विद्यार्थी खेळाडू सहभागी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत प्रकल्पस्तरीय दोन दिवसीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धा 5 आणि 6 डिसेंबर रोजी नांदवन (ता. साक्री) येथील अनुदानित आश्रमशाळेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या. प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि सुकापुर या चारही गटांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण 1545 विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या उद्घाटन कार्यक्रमास आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दशरथ शिंदे आणि मनोज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सतिश काकड, प्रकल्प क्रीडा समन्वयक विजय खैरनार, नांदवन आश्रमशाळेचे संस्थाध्यक्ष सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि विविध प्रकारच्या ॲथलेटिक स्पर्धांचा समावेश होता. कबड्डीमध्ये 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटात मुला-मुलींच्या संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. नांद्रे, रेवाडी, अनेर डॅम, धोंगडे, उडाणे आणि नवापाडा अशा शाळांनी विविध गटांमध्ये विजेतेपद मिळवले. खो-खो खेळात शिरपूर आणि सुकापुर गटातील खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत बहुतेक गटांमध्ये आघाडी घेतली. व्हॉलीबॉलमध्ये म्हसदी, लौकी, आमळी, देवळीपाडा, इंदवे आणि वाघाडी आश्रमशाळांनी मोठी छाप पाडली.
हँडबॉल स्पर्धांमध्ये नांदवन, इंदवे, वारसा, शिरसोले आणि उमरफाटा आश्रमशाळांनी विविध वयोगटात विजेतेपद पटकावले. तसेच 4×100 आणि 4×400 रिले शर्यतींमध्ये इंदवे, निमझरी, म्हसदी, राईनपाडा, नांदवन आणि चिपलीपाडा शाळांनी उत्तम धाव घेत पदकांची कमाई केली.
वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या प्रकारांत सर्व वयोगटांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध प्रकारांत एकूण 64 मुले आणि 61 मुलींनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक पटकावले.
दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या एकूण गुणांच्या आधारे सर्वसाधारण विजेतेपद रोहड ‘ब’ गटाने पटकावले असून त्यांना 505 गुण मिळाले. सुकापुर ‘अ’ गट 323 गुणांसह उपविजेता ठरला, तर शिरपूर गटाने 250 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. धुळे–शिंदखेडा गटाला एकूण 136 गुण मिळाले.
क्रीडा स्पर्धांसोबतच आदिवासी संस्कृतीवर आधारित नृत्य आणि गीतांच्या सांस्कृतिक स्पर्धादेखील घेण्यात आल्या. यात राईनपाडा आश्रमशाळेने प्रथम, नवापाडा आश्रमशाळेने द्वितीय आणि नांदवन आश्रमशाळेने तृतीय क्रमांक पटकावला. निमझरी आणि उमरपाटा आश्रमशाळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. सर्व पारितोषिकांचे वितरण प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन संदीप पाटील, जगदीश कोकणी, विजय खैरनार, सुवर्णा शिंदे, भारती बोरसे आणि भूषण सोनवणे यांनी केले.

-प्रतिनिधी तुषार देवरे,देऊर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top