साक्री तालुक्यातील आष्टाने येथे दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर श्री दत्तात्रेय सेवा आश्रमाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दत्तात्रेय दरबार, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टाने येथील आश्रम प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या आश्रमाच्या माध्यमातून गोशाळा, गोरगरीबांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्याचा संकल्प आश्रमाचे महंत 1008 अवधूत गिरी कल्याणगिरी महाराज यांनी केला आहे. हिंदू धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी 1008 हवन संकल्पना घेऊन त्यांनी हे कार्य सुरू केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पहिल्याच वर्षी आष्टाने येथील दत्तात्रेय सेवा आश्रमात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी म्हसदि येथील राजधर माऊली तसेच आश्रमाचे महंत 1008 अवधूत गिरी कल्याणगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला.
या नवनिर्मित आश्रमाच्या भूमिपूजन व दत्त जयंती कार्यक्रमाला साक्री तालुक्यातील हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. अवधूत गिरी महाराजांवरील श्रद्धेमुळे मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी आश्रमाला भेट देत महाप्रसादाचा लाभ घेतला.
-प्रतिनिधी निलेश सावळे

