उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर एसीबीच्या जाळ्यात…

अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातून जातीचा दाखला काढून देण्यासाठी तीन लाखांची मागणी करणाऱ्या शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाने चार महिन्यापूर्वी लाच मागितली होती. नितीन लीलाधर ठाकूर असे या शिक्षकाचे नाव असून विशेष म्हणजे एक लाख रुपये वेतन असताना देखील त्यांनी ही लाच मागितली आहे. नितीन लीलाधर ठाकूर हे धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूल मध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दाखला मिळावा यासाठी तक्रारदाराकडून अर्ज देण्यात आला होता मात्र तीन वर्षे उलटून देखील जातीचा दाखला न मिळाल्याने तक्रारदार तरुणीच्या मालेगाव येथे राहणाऱ्या भावाने संबंधित कार्यालयात भेट दिली यावेळी त्याच कार्यालयातील एका लिपिकाने शिक्षक नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले त्यानुसार संबंधित तरुणाने नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दाखल्यासाठी तीन लाख रुपये लागतील असे सांगितले.
तक्रादाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ठाकूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिक्षक नितीन ठाकूर हे एका मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य देखील आहेत. मनपा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात येणार होती, मात्र त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

