तरुणांनी संविधानिक मूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव

“तरुणांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव आणि मूलभूत कर्तव्यांची भावना दृढ झाली, तर देशाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. संविधानाने दिलेले अधिकार महत्त्वाचे असले तरी त्यासोबत असलेली कर्तव्ये पाळणेही तितकेच गरजेचे आहे. जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्र घडविण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते,” असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

शिवशाही फाउंडेशन भारत, सुयोग फाउंडेशन साक्री आणि विद्या विकास मंडळाचे सी.गो. पाटील महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा संवाद २०२६’ या कार्यक्रम प्रसंगी ते युवकांशी संवाद साधत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक बाळाराम माडकर, डीवायएसपी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे आणि उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संवादादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा तसेच व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पुढे म्हणाले की, यश कोणाचीही मक्तेदारी नसून ते प्रत्येकासाठी खुले आहे. स्वतःची ओळख निर्माण करून सकारात्मक विचारांनी आयुष्य जगणारा प्रत्येक तरुण यशस्वी होऊ शकतो. आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत आणि व्यसनांपासून दूर राहण्याची सवय ही व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबात एक जरी व्यसनी व्यक्ती असला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, परंतु एक सद्विचारी आणि संस्कारशील व्यक्ती असली तरी संपूर्ण पिढी योग्य दिशेने घडू शकते. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात स्पष्ट ध्येय ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणतेही यश दूर नाही, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय मनोगतात चंद्रजीत पाटील यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा हा केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून समाजासाठी काम करण्याची आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची मोठी संधी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थी निश्चितपणे यश मिळवू शकतात. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर मोठी पदे मिळवून यशाची नवी उदाहरणे निर्माण केली आहेत. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि अपयश आले तरी खचून न जाता संघर्ष करत राहावे, कारण आजचा संघर्षच उद्याचे यश घडवतो, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक बाळाराम माडकर आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयोग फाउंडेशनचे सचिव डॉ. शुभम गौड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहिते यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे २८० विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल गौड, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

( प्रतिनिधी : निलेश सावळे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top